सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन

जागतिक बाजारात हळदीचे दर निश्चित करणाऱ्या सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन (जिऑग्राफिकल इंडेक्स :GI ) मिळावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी प्रथम २०१३ मध्ये मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाकडे केली होती. परंतु त्याचवेळी वर्धा जिल्ह्यतील वायगाव येथील हळदीने इतर वाणांच्या हळदीला मागे टाकून जीआय मानांकन मिळविले होते.

काही काळानंतर सांगलीच्या हळदीचा फेरप्रस्ताव सादर झाल्यावर शेतकऱ्यांतर्फे ‘जीआय’ विषयातील अभ्यासक प्रा. गणेश हिंगमिरे यांनी भौगोलिक उपदर्शन नोंदणी विभागाचे सहायक रजिस्ट्रार चिन्नाराजा जी. नायडू यांच्यासमोर सांगलीच्या हळदीच्या वैशिष्ट्यांची मांडणी केली. सांगलीच्या हळदीमध्ये असलेले विविध औषधी गुणधर्म, हळदीची इथे असलेली वैशिष्टय़पूर्ण बाजारपेठ, साठवणुकीसाठी नैसर्गिक पेवाचा वापर, रंग, गुणधर्म यामुळे सांगलीच्या हळदीला हे भौगोलिक मानांकन मिळाले आहे.

भारतातील ८० टक्के हळदीचा व्यापार सांगलीमधून होतो. देशातील दरही येथील बाजार समितीतील दरावरच अवलंबून असतो. केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यामुळे यापुढे हळद ही सांगलीचा ब्रँड म्हणून कायमस्वरूपी बाजारात विकली जाणार आहे.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: