व्यक्ती विशेष – मुथुवेल करुणानिधी

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचं वयाच्या 94 व्या वर्षी 28 जुलै रोजी निधन झाले आहे.

एम. करुणानिधी –

मुथुवेल करुणानिधी यांचा जन्म 3 जून 1924 रोजी झाला. करुणानिधी यांना लहानपणापासून नाट्य, कला, साहित्य यांची आवड होती. पटकथा लेखक म्हणून करुणानिधी यांनी तामिळ चित्रपटसृष्टीतून आपल्या करिअरची सुरूवात केली.

वयाच्या 14 व्या वर्षी करुणानिधी यांनी राजकारणात प्रवेश केला. करुणानिधी हे त्यांच्या कारकिर्दीत 12 वेळा आमदार म्हणून निवडून आले. तसेच, त्यांनी तामिळनाडू राज्याचं पाचवेळा मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. प्रादेशिक पक्षाचे सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषविणारे पहिले नेते ठरले.

तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील कुलिथालाई विधानसभा क्षेत्रातून करुणानिधी 1957 साली पहिल्यांदा निवडून आले. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरु भारताचे पंतप्रधान होते.

करुणानिधी यांनी 1969 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच वर्षी द्रमुकचे संस्थापक सीएन अन्नादुराई यांचं निधन झाल्यावर पक्षाचं नेतृत्व करुणानिधींकडे सुपूर्द करण्यात आलं.

करुणानिधी पहिल्यांदा (1969) आणि दुसऱ्यांदा (1971) तामिळनाडूचे सीएम झाले, त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांनी तिसऱ्यांदा (1989) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा राजीव गांधी पीएम होते. चौथ्यांदा (1996) करुणानिधी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले, तेव्हा नरसिम्हा राव पंतप्रधानपदी होते. पाचव्यांदा (2006) करुणानिधींनी तामिळनाडूचं मुख्यमंत्रिपद स्वीकारलं तेव्हा देशाची धुरा मनमोहन सिंग यांच्याकडे होती.

2004 साली करुणानिधी यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करत संपुआ सरकारमध्येही स्थान मिळवले.

2014 साली त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणूकांमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.  2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जयललिता यांचा अण्णाद्रमुक पक्ष विजयी झाला.

सध्या त्यांचा पक्ष तामिळनाडू विधानसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे.

आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत करुणानिधींनी कुलीतलाई, तंजावर, सैदापेट, अण्णानगर, हार्बर, चेपॉक, तिरुवरुर मतदारसंघातून निवडणूक लढवली.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: