व्यक्ती विशेष – ‘पिंगली वेंकैया’

भारतीय राष्ट्रध्वजाचे आद्य रचनाकार - पिंगली वेंकैया

पिंगली वेंकैया यांची 2 ऑगस्ट रोजी 142वी जयंती साजरी झाली.

भारतीय राष्ट्रध्वजाचे म्हणजेच तिरंग्याचे आद्य रचनाकार म्हणून पिंगली वेंकैया यांना ओळखले जाते.

1876 साली त्यांचा सध्याच्या आंध्रप्रदेश राज्यात असणाऱ्या मच्छलीपट्टम येथील भतलामपेनूमारू येथे जन्म झाला होता.

वयाच्या 19व्या वर्षी ते ब्रिटीश लष्करात भरती झाले व दक्षिण आफ्रिकेमधील अँग्लो बोएर युद्धामध्ये सैनिक म्हणून ब्रिटिशांच्या बाजूने लढले.

याच काळात त्यांची आणि महात्मा गांधींची दक्षिण आफ्रिकेमध्ये भेट झाली. त्यानंतर पुढील पन्नास वर्षाहून अधिक काळ हे दोन्ही नेते एकमेकांच्या संपर्कात होते.

पिंगली हे जियोलॉजीमध्ये डॉक्टरेट होते. ते हिरे खाण उत्खन्नातील तज्ञ होते. त्यामुळेच त्यांना डायमंड वेंकैया हे टोपणनाव देण्यात आले होते.

त्याचप्रमाणे कापसावरील संशोधनामध्ये त्यांना विशेष स्वारस्य असल्याने त्यांना कॉटन वेंकैया नावानेही ओळखले जायचे.

31 मार्च 1921 मध्ये पिंगली यांनी विजयवाडा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीमध्ये भगव्या आणि हिरव्या रंगाचा झेंडा भारतीय राष्ट्रध्वज म्हणून सादर केला.

मूळचे जालंधरच्या असणाऱ्या लाला हंसराज यांनी या झेंड्यावर चर्खा असावा असे सांगत चर्ख्यासहीत हा झेंडा सादर केला तर गांधीजींनी भगव्या आणि हिरव्या रंगाच्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्टीचा सल्ला दिला आणि अशाप्रकारे तिरंग्याचा जन्म झाला.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पिंगली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या तिरंगी झेंड्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली. भारतीय संविधान समितीने 22 जुलै 1947 रोजी तिरंगा झेंडा भारताचा राष्ट्रध्वज असल्याचे जाहीर केले.

भारताचा तिरंगा दिल्लीतील लाल किल्ल्यावर फडकताना पाहण्याची त्यांची शेवटची इच्छा होती. मात्र त्यांच्या कुटुंबाकडे त्यांना दिल्लीला पाठवण्याइतके पैसे नसल्याने त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.

1963 साली पिंगली यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर काही दशकांनी 2009 साली भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी हे तिकीट जारी करण्यात आले होते.

2011 साली भारतरत्न पुरस्कारासाठी (मरणोत्तर) पिंगली यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: