राज्यसभेचे उपसभापती – हरिवंश नारायण सिंह

राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिवंश नारायण सिंह यांची निवड झाली आहे.

उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत हरिवंश नारायण सिंह यांनी विरोधी पक्षांचे हरिप्रसाद यांच्यावर १२५ मतांनी विजय मिळवला.

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी एनडीएकडून हरिवंश नारायण सिंह तर विरोधी पक्षांकडून हरिप्रसाद यांना नेमण्यात आले होते. या निवडणुकीत हरिवंश सिंह यांना १२५ मते मिळाली. तर हरिप्रसाद यांना १०५ मते मिळाली.

हरिवंश नारायण सिंह –

हरिवंश नारायण सिंह यांचा जन्म 30 जून 1956 रोजी बलिया जिल्ह्यातील सिताबदियारा गावात झाला होता. हरिवंश जेपी आंदोलनामुळे प्रेरित झाले होते. त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात एमए आणि पत्रकारितेत डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात टाइम्स समूहातून केली होती.

यानंतर हरिवंश सिंह यांच्याकडे धर्मयुग या साप्ताहिकाची जबाबदारी सोपवण्यात आली. 1981 पर्यंत हरिवंश सिंह धर्मयुगचे उपसंपादक होते. यानंतर त्यांनी पत्रकारिता सोडली आणि 1981 पासून 1984 पर्यंत हैदराबाद, पाटणामध्ये बँक ऑफ इंडियात नोकरी केली. 1984 मध्ये ते पुन्हा एकदा पत्रकारितेत परतले आणि 1989 पर्यंत त्यांनी ‘आनंद बाजार पत्रिका’च्या ‘रविवार’ या साप्ताहिकाचे सहाय्यक संपादक म्हणून काम केलं.

नव्वदच्या दशकात हरिवंश सिंह बिहारमधील एका मोठ्या मीडिया समूहात रुजू झाले.याचदरम्यान त्यांची नितीश कुमार यांच्याशी जवळीत वाढली. त्यानंतर हरिवंश सिंह यांची जेडीयूचे सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली. 2014 मध्ये जेडीयूने हरिवंश यांना राज्यसभेसाठी नामांकित केलं. अशाप्रकारे हरिवंश सिंह पहिल्यांदा संसदेत पोहोचले.

हरिवंश हे झारखंड येथील प्रभात खबरचे प्रिन्सिपल एडिटर होते. ते माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे सल्लागारही होते. हरिवंश हे रालोआचे उमेदवार होते. पण आता उपसभापतिपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ते आता कोणत्याही एका पक्षाचे नाहीत.

राज्यसभा -

राज्यसभा हे भारतीय संसदेतील ज्येष्ठ सभागृह आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात.

राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असून एक तुतीयांश सभासदांची निवड दर दोन वर्षांनी होते. राज्यसभेचे सत्र कायमस्वरुपी असून ते लोकसभेप्रमाणे विलीन होत नाही.

राज्यसभा व लोकसभा यांना समान अधिकार आहेत, शिवाय धन विधेयक (Money/Supply Bill) जेथे लोकसभेस अध्यारोही अधिकार आहेत.

भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेच्या उपाध्यक्षांची निवड सदस्य मतदानाने होते. अध्यक्षांच्या गैरहजरीत उपाध्यक्ष सभेचे कामकाज पाहतात.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: