निधन वार्ता – क्रांतिकारी संत तरुण सागर

जैन मुनी तरुण सागर यांचं १ सप्टेंबर रोजी वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झाले आहे. पूर्व दिल्लीतील कृष्णा नगर येथील राधापुरी जैन मंदिरात तरुण सागर यांनी अखेरचा श्वास घेतला.

कावीळ झाल्यानंतर स्वतःच्या प्रकृतीमध्ये काही सुधारणा होत नसल्यामुळे अखेर त्यांनी संथारा घेण्याचे ठरवले. काही दिवसांपासून तरुण सागर हे पुष्पदंत सागर महाराजांच्या परवानगीने संथारा घेत होते. संथारा म्हणजे जैन धर्मानुसार मृत्यू समीप पाहून अन्न-पाण्याचा त्याग करणे.

अल्प परिचय –

मुनी तरुण सागर यांचे मूळ नाव पवन कुमार जैन आहे. त्यांचा जन्म 26 जून 1967 रोजी मध्य प्रदेशातील दमोह इथल्या गुहजी गावात झाला. त्यांच्या आईचं नाव शांतीबाई आणि वडिलांचं नाव प्रताप चंद्र आहे. मुनीश्री तरुण सागर यांनी 8 मार्च 1981 रोजी गृहत्याग केला. त्यानंतर त्यांनी छत्तीसगडमध्ये दीक्षा घेतली.

तरुण सागर यांनी मध्य प्रदेश आणि हरियाणा विधानसभेतही प्रवचन दिलं होतं. हरियाणा विधानसभेतील प्रवचनावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. मध्य प्रदेश सरकारने 6 फेब्रुवारी 2002 रोजी त्यांना राजकीय अतिथीचा दर्जाही दिला होता.

आपले ‘कडवे बोल’ या प्रवचनमालेसाठी ओळखले जाणारे तरुण सागर देशभरात नेतेमंडळीमध्ये लोकप्रिय होते.

संथारा –

जैन धर्माच्या मते, मृत्यू समीप आल्याचं पाहून काही व्यक्ती अन्न-पाण्याचा त्याग करतात.  जैन शास्त्राच्या मते याप्रकारच्या मृत्यूला संथारा किंवा संल्लेखना म्हणजेच मृत्यू पर्यंत उपवास करणं म्हणतात. याला जीवनाची अंतिम साधना मानली जाते.

राजस्थान हायकोर्टाने 2015 मध्ये संथाराला आत्महत्येसारखेच असल्याचं सांगत, दंडनीय केलं होतं. मात्र दिगंबर जैन परिषदेने हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री संस्कृत विद्यापीठातील प्राध्यापक वीर सागर जैन यांच्या मते, संथाराची प्रक्रिया 12 वर्षांपर्यंत चालते. ही जैन समाजाची आस्था आहे, त्याला मोक्ष प्राप्तीचा मार्ग समजलं जातं.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: