डेन्मार्कमध्ये बुरखा आणि निकाब परिधान करण्यावर बंदी

अन्य युरोपियन देशांप्रमाणे डेन्मार्कमध्येही बुरखा आणि निकाब परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. डेन्मार्कच्या संसदेने बुरखा आणि निकाब बंदीचा कायदा मंजूर केला आहे.

डेन्मार्कच्या संसदेत गुरुवारी बुरखा आणि निकाब बंदीचे विधेयक ७५ विरुद्ध ३० मतांनी मंजूर झाले. डोक्याला बांधायचा स्कार्फ, पगडी आणि पारंपारिक ज्यू टोपीवर बंदी घालण्यात आलेली नाही. डेन्मार्कमध्ये काही मुस्लिम महिला संपूर्ण शरीर आणि चेहरा झाकणारी वस्त्रे परिधान करत होती. या निर्णयामुळे यापुढे डेन्मार्कमध्ये मुस्लिम महिलांना बुरखा आणि निकाब परिधान करता येणार नाही.

येत्या १ ऑगस्टपासून डेन्मार्कमध्ये या कायद्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना १हजार क्रोनर (डेन्मार्क चलन) दंड ठोठावण्यात येईल. दुसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन करताना पकडले तर १० हजार क्रोनरचा दंड किंवा सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: