ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच दीर्घ आजाराने निधन झालं आहे.

विजय चव्हाण यांचा जन्म लालबाग येथे झाला. विजय चव्हाण यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल या कॉलेजमधून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत.

विजय चव्हाण हे मराठी रंगभूमीवरचे कलाकार आहेत. त्यांनी अनेक नाटकांत आणि चित्रपटांत कामे केली असून, प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेल्या मोरूची मावशी या नाटकातील मावशीच्या स्त्री-भूमिकेसाठी ते विशेष ओळखले जातात. या नाटकाचे जवळ जवळ दोन हजार प्रयोग झाले. त्यानंतर मालिका आणि चित्रपटात काम करत असलेल्या या कलावंताने एकाच नाटकात चौदा भूमिका करण्याचाही विक्रम केला|

अभिनेते विजय कदम हे विजय चव्हाण यांचे वर्गमित्र. विजय कदम, विजय चव्हाण आणि एक मित्र या तिघांनी मिळून “रंगतरंग’ नावाची नाट्यसंस्था सुरू केली. विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका विजय कदम यांच्यामुळे मिळाली.

मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिदीर्तील सगळ्यात गाजलेले नाटक आहे. या नाटकात त्यांनी मोरूची मावशी अप्रतिम रंगवली. हे नाटक त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाले होते.

विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली.1985 साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. विजय चव्हाण यांनी आतापर्यंत 350-400 चित्रपटांमध्ये काम केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.

मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली आहेत.

त्यांना आतापर्यंत ‘अशी असावी सासू’ मधील भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आणि स्क्रीन पुरस्कार हे दोन्हीही व २०१७ सालचा संस्कृती कलादर्पणचा जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: