‘इस्रो’ची यशस्वी चाचणी

मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीचा एक भाग असलेल्या क्रू एस्केप सिस्टीमची म्हणजेच अवकाशवीरांना आणीबाणीच्या क्षणी जमिनीवर सुखरूप आणण्याची चाचणी इस्रोने यशस्वी केली.

मानवी अवकाश मोहिमेमध्ये प्रक्षेपणानंतर काही बिघाड निर्माण झाल्यासही मुक्तता यंत्रणा कार्यान्वित होते आणि अवकाशयानाचा एक भाग अंतराळवीरांसह प्रक्षेपकापासून दूर जातो. त्यानंतर हे क्रू मोडय़ुल म्हणजे अवकाशयानाचा मुख्य भाग अंतराळवीरांसह जमिनीवर आणण्यात येतो.

उपग्रह प्रक्षेपण तळावरून घेण्यात आलेली ही पहिलीच चाचणी असल्याचे इस्रोने म्हटले आहे.

श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन केंद्रावरून गुरुवारी सकाळी प्रक्षेपक आकाशात झेपावले. प्रक्षेपक यान जमिनीपासून २.७ कि.मी. ऊंचीवर असताना एस्केप सिस्टीम आणि क्रू मोडय़ुल प्रक्षेपक यानापासून वेगळे करण्यात आले.

चाचणीच्या वेळी अंतराळवीराऐवजी त्याचा पुतळा वापरण्यात आला होता. यानाचे दोन भाग होताच अंतराळवीराचा पुतळा असलेले कॅप्सूल पॅराशूटच्या साहाय्याने बंगालच्या उपसागरात विशिष्ट ठिकाणी उतरविण्यात आले.

या चाचणीमुळे अवकाशयानाला अपघात झाल्यास किंवा काही कारणाने ते कोसळल्यास अंतराळवीरांचा जीव वाचविता येणे शक्य होणार आहे. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी मानवी अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: