आज शतकातील सर्वांत मोठे चंद्रग्रहण

आज (२७ जुलै) शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण देशातील सर्व खगोलप्रेमी याबरोबरच नागरिकांना पाहता येणार आहे.१ तास दीड मिनिटे इतकी चंद्राची खग्रास अवस्था असणार असून, शुक्रवारी रात्री १०.४५ मिनिटांनी हे ग्रहण सुरू होणार आहे.

ग्रहण कालावधी चार तास (तीन तास पंचावन्न मिनिटे) असल्याने हे सर्वांत मोठ्या कालावधीचे ठरणार आहे. यानंतर पुन्हा ९ जून २१२३ मध्ये असे ग्रहण अनुभवयास मिळेल.

पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातील जवळपास सर्वच खंडांतून (युरोप, आफ्रिका, आशिया, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड व दक्षिण अमेरिका) हे ग्रहण पाहायला मिळणार आहे. संपूर्ण भारतातून ग्रहणाच्या सर्व स्थिती पाहायला मिळणार आहे.

पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हटले जाते. या काळात चंद्र हा पृथ्वीपासून दूर जाणार असून त्याचा वेग नेहमीपेक्षा मंदावणार आहे.

जुलै महिन्यामध्ये सूर्य हा पृथ्वीपासून दूर अंतरावर असतो. त्यामुळे पृथ्वीची लांबलचक सावली पडत असते. या ग्रहणादरम्यान चंद्र या सावलीतून जात असल्याने हे ग्रहण पाहायला मिळते.

चंद्र पृथ्वीपासून लांब गेल्याने चंद्राचा छोटा आकार, त्याचा मंदावलेला वेग आणि पृथ्वीची मोठी सावली या तीन प्रमुख कारणांमुळे हे ग्रहण निर्माण होते.

२७ जुलै २०१८ रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण हे ‘सारोस’ चक्रातील १२९ वे ग्रहण आहे. या आधीचे सर्वांत मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण १६ जुलै २००० या दिवशी झाले होते. योगायोग म्हणजे दोन्हीही ग्रहणे एकाच सारोस चक्रातील आहेत.

 

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: