अटल बिहारी वाजपेयी कालवश

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले.

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी सध्याच्या मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला होता. आग्रा विद्यापीठात राज्यशास्त्रातून त्यांनी एम.ए. केले. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांचा समाज कार्यात सहभाग वाढू लागला होता.

अटलबिहारी वाजपेयी यांची राजकीय कारकीर्द –

१९३९ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते स्वयंसेवक म्हणून दाखल झाले. त्यानंतर बाबासाहेब आपटे यांच्या प्रेरणेने १९४० ते १९४४ अशी पाच वर्षे पदाधिकारी प्रशिक्षण वर्गात ते दाखल झाले आणि १९४७ मध्ये पूर्णवेळ प्रचारक म्हणून त्यांनी संघाचे काम सुरू केले.

१९४८मध्ये संघावर बंदी आली. बंदी उठल्यानंतर १९५१ मध्ये ‘भारतीय जनसंघ’ या संघविचारी राजकीय पक्षाची स्थापना झाली आणि त्याची जबाबदारी वाजपेयी आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्यावर सोपविण्यात आली. पक्षाचे सरचिटणीस म्हणून वाजपेयी काम करू लागले.

१९५७ मध्ये त्यांनी प्रथम लोकसभेची निवडणूक लढवली. मथुरा मतदारसंघात ते पराभूत झाले, मात्र बलरामपूरमध्ये विजयी झाले. 

१९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. तेव्हा अनेक राजकीय नेत्यांसह वाजपेयी यांनाही अटक झाली. १९७७ मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सर्व काँग्रेसविरोधी पक्षांचा ‘जनता पक्ष’ हा आघाडी पक्ष स्थापन झाला. त्यात वाजपेयी यांनी जनसंघ विलीन केला.

१९७७ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत जनता पक्ष विजयी झाला. मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री म्हणून वाजपेयी हे नियुक्त झाले. याच काळात त्यांच्यातील सर्वसमावेश नेतृत्व ठळकपणे जगासमोर आले.

१९७९ मध्ये जनता पक्षाचे सरकार कोसळल्यावर जनता पक्षही फुटला. त्यावेळी १९८० मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘भारतीय जनता पक्षा’ची स्थापना केली. या पक्षाचे ते पहिले अध्यक्ष होते.

१६ मे ते एक जून १९९६ असे १३ दिवसांचे सरकार वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर टिकले. अवघ्या एका मताने विश्वासदर्शक ठराव ते हरले होते.

१९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ अशी सलग पाच वर्षे ते पंतप्रधानपदी आरूढ झाले.

२००४ ची निवडणूक हरल्यानंतर राजकारणातून ते हळुहळू बाहेर पडले.

वाजपेयी यांना 2015 मध्ये भारतातील सर्वोच्च असणाऱ्या भारतरत्न या किताबाने गौरविण्यात आले.

वाजपेयी यांच्या कार्यकाळातील काही महत्वपूर्ण घडामोडी -

परराष्ट्र धोरण

अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात काही महत्वपूर्ण निर्णय झाले. वाजपेयींनी अमेरिकेबरोबर मैत्रीसंबंध विकसित करण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेबरोबर व्यापार वाढला. द्विपक्षीय संबंध सुधारले. शेजारच्या चीन बरोबरही आर्थिक संबंध विकसित करण्यावर भर दिला. दोन्ही देशांमधला सीमावाद सोडवण्यासाठी चर्चा सुरु केली.

पाकिस्तान बरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न

पाकिस्तान बरोबरचा तणाव संपवण्यासाठी वाजपेयींनी विशेष प्रयत्न केले. दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्यासाठी त्यांनी दिल्ली-लाहोर बससेवा सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला. स्वत:हा त्या बसमध्ये बसून पाकिस्तानात गेले. वाजपेयी यांच्या परराष्ट्र धोरणातील तो एक महत्वपूर्ण उत्तम निर्णय होता.

यशस्वी अण्वस्त्र चाचणी

११ मे १९९८ हा दिवस आधुनिक भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस म्हणून गणला जातो. कारण याच दिवशी भारताने राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये यशस्वी अणू चाचण्या करून स्वतःला सिद्ध केले होते. तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अणू चाचणीच्या या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले होते.

कारगिल युद्ध

वाजपेयी पंतप्रधान असतानाच भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिल युद्ध झाले होते. पाकिस्तानी सैन्याने सीमा ओलांडून कारगिलमध्ये घुसखोरी केली होती. वाजेपयींना याविषयी समजताच त्यांनी भारतीय लष्कराला घुसखोरांना हुसकावून लावण्याचे आदेश दिले. भारतीय लष्कराने या युद्धात आपला सर्वोच्च पराक्रम दाखवत पाकिस्तानी घुसखोरांना पिटाळून लावत आपला भूभाग परत मिळवला. १९९९ सालच्या मे ते जुलै दरम्यान हे युद्ध लढले गेले.

शिक्षण आणि आर्थिक धोरण

अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात केली. ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मुलभूत अधिकार मिळवून दिला. त्यांच्या कार्यकाळातच राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाची सुरुवात झाली आणि देशात उत्तम दर्जाचे महामार्ग बांधले गेले.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: